कर्जाच्या परतफेडीचे योग्य नियोजन.

कर्जाची जलद परतफेड करण्यासाठी परतफेडीचे वेळापत्रक तयार करणे अतिशय महत्वाचे असते.

वर्तमान काळात बहुतेक उद्योजक बिझनेस लोन घेतात आणि त्यामुळे त्यांच्यावर परतफेडीचे ओझे असते.

काही कर्ज देणार्‍या कंपन्या परतफेड करण्याच्या नियमात लवचिक असतात ज्यामुळे उद्योजकांना ताण न घेता परतफेडीचे व्यवस्थित नियोजन करणे शक्य होते. अनेकदा असे होते की उद्योजकाने अनेक कर्ज घेतले असतात आणि परतफेड करणे अवघड जाते.

वेळेत कर्जाची परतफेड न केल्यास वाढीव व्याज दर लागू होतो. अशाने सिबिल स्कोरवर प्रतिकूल परिणाम झाल्याने भविष्यात कर्ज मिळवणे कठीण जाते.

कर्जाच्या परतफेडीचे नियोजन करण्याचे टप्पे:

1. परतफेडीचा आराखडा 

परतफेडीचे नियोजन करण्यासाठी तुम्हाला सर्व बिले, देय कर्जाचे अभिलेख, कर्जाच्या रकमा, दिलेले हप्ते, दंड व व्याज इत्यादी माहिती गोळा करावी लागेल. ही माहिती वापरुन परतफेड केलेली रक्कम आणि थकित रक्कम याचा हिशेब करता येतो. यानंतर तुम्हाला मासिक खर्चार्चे बजेट व कर्जाच्या परतफेडीचा आराखडा ठरवता येतो.

2. संकट आले असल्यास प्रतिसाद देणे आवश्यक असते

अनेक कर्ज व बिले थकित असल्यास क्रेडिट कार्ड वापरणे बंद केले पाहिजे. अशाने कार्डाचा अनावश्यक वापर कमी होतो आणि खर्च ही कमी होतो.

3. जास्त व्याज दर असलेल्या कर्जाची परतफेड आधी करावी

सर्व थकित कर्जाची माहिती गोळा केल्यानंतर जास्त व्याज दराच्या कर्जाची परतफेड करण्याला प्राधान्य द्या. अशाने कर्जाचे ओझे हलके होते व उरलेले कर्ज लवकर परत करता येते. म्हणून उच्च व्याज दर असलेले कर्ज घेणे टाळले पाहिजे व कमी व्याज दर असलेले कर्ज निवडणे उत्तम.

4. दैनंदिन खर्च कमी करावा

अनावश्यक खर्च कमी करणे महत्त्वाचे असते. प्रथम अनावश्यक खर्चांची यादी करा आणि मग ते खर्च टाळा. उदाहरणार्थ: उपकरण, मशीनरी, वाहन ह्यांचा अनावश्यक वापर कमी करावा. न वापरल्या जाणाऱ्या सामग्रीची विक्री करावी. अशाने व्यवसायासाठी आवश्यक नसलेले खर्च वाचतात व अधिक उत्पन्न निर्माण होते व कर्जाच्या परतफेडीस मदत होते.

5. कर्जाच्या अटी व शर्ती बदलून घेण्याचा प्रयत्न करा

कर्जाच्या अटी व शर्ती बदलून घेण्यासाठी कर्ज देणार्‍या कंपनीशी चर्चा केल्यास वाजवी व्याज दर ठरवता येतो व ईएमआय प्लॅनची पुनर्रचना करता येते. ह्याने हप्ता व व्याज कमी होण्यास मदत होते.